‘अनिकेत, अरे लक्ष्मण दादाचा फोन आला होता काल, वॅगन आर गाडी बुक केलीय म्हणून सांगायला...’
दोन-तीन दिवसांपूर्वी आईनं मला फोनवर सांगितलं. आईच्या या वाक्यानंतर माझ्या मनःचक्षूंपुढे एकदम १३-१४ वर्षांपूर्वीचा लक्ष्मण दादा उभा राहिला. वामनमूर्ती, जन्मजात असलेला पण उन्हात काम करून आणखी गडद झालेला कृष्ण वर्ण, दगड फोडायचं काम करून घट्ट झालेले हात, रापलेला चेहरा, गरिबीमुळे असलेल्या न्यूनगंडाच्या भावनेची चेहऱ्यावर जाणवत असलेली छोटीशी छटा, पण डोळे मात्र बोलके, आत्मविश्वासाची चमक असलेले, वय वर्षं साधारण १६-१७च्या आसपास...
रूढार्थानं बघायला गेलं, तर लक्ष्मण दादा हा माझा भाऊ नव्हे किंवा आमचा कोणी नात्यातलाही नव्हे. पण एका घटनेमुळं त्याचे आणि आमच्या कुटुंबाचे ऋणानुबंध निर्माण झाले. सख्ख्या नात्यातल्या माणसांशी असलेले ऋणानुबंधही जीर्ण होण्याचा सध्याचा काळ. पण आमच्या नात्याची वीण रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट आहे. १९९६-९७ च्य़ा दरम्यान कधीतरी माझे बाबा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने देवरुखजवळच्या निवे (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या आश्रमशाळेत गेले होते. त्यावेळी बाबांची एका मुलाशी भेट झाली. दहावीला ८५ टक्के मिळवून शाळेत पहिल्या आलेल्या त्या मुलाचं नाव होतं लक्ष्मण सुब्बू नाईक. दग़ड फोडून रस्ते बांधणाऱ्या लमाणी कुटुंबातला तो मुलगा. पण तल्लख मेंदू आणि ‘हार्ड वर्क’ करायची सवय याच्या जोरावर लखलखीत यश मिळवलेला. गणित आणि विज्ञानातले मार्क्स ९० टक्क्यांच्या पुढे. क्लास नाही नि काही नाही. कामं सांभाळत स्वतःहून केलेला अभ्यास, हेच त्याच्या यशाचं गमक. इंजिनीअर व्हायचं स्वप्न बाळगलं होतं त्यानं. त्यासाठी रत्नागिरीत अॅडमिशन घेऊन त्यानं अकरावी-बारावी उत्तम गुणांनी पूर्ण केली.
पण एवढं धवल यश मिळवूनही त्याच्या आयुष्यात जणू अंधार यायचीच वेळ आली होती. बारावीनंतर इंजिनीअरिंगसाठी त्याला अॅडमिशन घ्यायची होती. पण त्यासाठी सरकारी कार्यालयाकडून त्याच्याकडे मागितला गेला त्याच्या वडिलांनी शाळा सोडल्याचा दाखला. तो त्याच्याकडे असण्याची सुतराम शक्यता नव्हती. कारण त्यांच्या कुटुंबात निरक्षरतेची ‘लक्ष्मण’रेषा ओलांडलेला तोच पहिला होता. अगदी त्याचा जुळा भाऊ राम हादेखील निरक्षरच. वडिलांनी जिथे शाळेचं तोंडही पाहिलेलं नाही, तिथे त्यांनी शाळा सोडल्याचा आणि त्याचा दाखला असल्याचा प्रश्नच कुठे येतो? हे सगळं त्या कार्यालयात पटवून देऊनही लक्ष्मणला आवश्यक असलेलं सर्टिफिकेट मिळालं नाही. सध्याच्या काळात माणसानं स्वतःची गुणवत्ता नुसती दाखवून उपयोग नाही, तर ती सिद्ध करण्यासाठी कागद दाखवावा लागतो आणि इथे लक्ष्मणच्या बाबतीत तर अस्तित्वात असण्याची शक्यताच नसलेल्या कागदाचा प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्या निरर्थक कागदापायी त्याच्या आयुष्याचा अनर्थ होणार होता. आपल्याला जे करता आलं नाही, ते मुलानं करावं, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी त्याच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले़. पण सरकारी नियमांना ते मान्य नव्हतं. एक वेळ शेकडो बोगस विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेतला तरी चालेल, पण एका गुणवान विद्यार्थ्याला सरळपणे शिक्षण घेऊ द्यायचं नाही, असं आपल्या सरकारी नियमांचं स्वरूप....त्याला त्या कार्यालयातले कर्मचारी तरी बिचारे काय करणार? आणि देवळात जाताना जशा चपला बाहेर काढून ठेवतात, तसं कार्यालयात शिरताना संवेदनशील मन बाहेर ठेवून यायचं, असा सरकारी कार्यालयातला एक अलिखित नियम. एक वेळ लिखित नियम धाब्यावर बसवले तरी चालतील, पण हा अलिखित नियम पाळला गेलाच पाहिजे, असा सरकारी खाक्याच...
.अशा सगळ्या कारणांमुळे लक्ष्मणच्या नशिबी शेवटी काय आलं, तर वडिलोपार्जित व्यवसाय....दगड फोडून रस्ते तयार करण्याचा... इतरांचा प्रगतीचा मार्ग सुलभ करण्याचा. कारण त्या एका कागदाशिवाय त्याचं अॅडमिशन होणारच नव्हतं ना! त्याचं इंजिनीअर व्हायचं स्वप्न खरोखरच ‘धुळी’ला मिळाल्यातच जमा होतं. कारण शिक्षण घेत असतानाही जिथे हे काम चुकलं नव्हतं, तिथे पुढे शिक्षण होणारच नसताना त्यानं रस्त्यावरचं काम करण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. नाहीतर, हातावर पोट असलेलं त्यांचं कुटुंब कसं पोसलं जाणार?
कोणत्याही संवेदनशील मनाला हात घालेल अशीच ही कहाणी... माझ्या बाबांना हे सारं कळल्यावर त्यांनी आणखी सविस्तर माहिती घेतली आणि ‘सकाळ’मध्ये बातमी लिहिली.... ‘व्हायचं होतं अभियंता, पण नशिबी आली मजुरी’… सकाळच्या सर्व आवृत्त्यांमध्ये ती प्रसिद्ध झाली. त्यानंतर मात्र लक्ष्मणच्या आयुष्यात जणू नवी सकाळ झाली. कारण साताऱ्यातल्या अशोक वासुदेव बक्षी नावाच्या एका समाजहितैषी व्यक्तीनं ती बातमी वाचून त्याची दखल घेतली. त्यांनी फोनाफोनी करून बाबांचा नंबर मिळवला. बाबांना फोन केला आणि या प्रकरणात आपण स्वतः मदत करू इच्छित असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी कोर्टात केस दाखल केली. त्याचा निकाल लागेपर्यंत लक्ष्मणला आहे त्या कागदपत्रांच्या आधारे अॅडमिशन द्यावी असा निकाल कोर्टाने दिला. त्यामुळे अखेर लक्ष्मणला लोणेरे इथल्या बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात बी. टेक.ला (कम्प्युटर) अॅडमिशन मिळाली. तेव्हापासून लक्ष्मण आमच्या घरी यायला लागला आणि माझा नि पिंकीचा तो लक्ष्मण दादा कधी झाला, ते आम्हालाच कळलं नाही. यथावकाश कोर्टाचा निकालही त्याच्या बाजूने लागला. माझ्या बाबांनी बातमी दिली, हे या यशाचं मूळ कारण असलं, तरी बक्षी यांच्यासारख्या एका भल्या माणसानं केलेली प्रचंड धडपडही तेवढीच महत्त्वाची होती. अन्यथा पुढे काहीच झालं नसतं. ‘कोणत्याही संवेदनशील पत्रकारानं केलं असतं, तेच मी केलं, वेगळं असं काही नाही,’ अशी बाबांची भूमिका होती. पण, दरवेळी तो आमच्याकडे येई, तेव्हा त्याच्या डोळ्यांत बाबांविषयीची कृतज्ञता ओथंबून भरलेली जाणवे. त्यांच्या अख्ख्या कुटुंबामध्येही ही जाणीव होती. एक प्रसंग मला आठवतोय. आम्ही जिथं भाड्यानं राहत होतो, त्या घराच्या गेटच्या बाहेर संध्याकाळी सातच्या सुमारास डोक्यावर गाठोडं घेतलेला एक मुलगा उभा होता. तो काहीतरी विचारत होता, पण आम्हाला काय ते कळलं नाही. बाहेर जाऊन चौकशी केली, तेव्हा कळलं, की तो लक्ष्मणचा धाकटा भाऊ सदानंद होता. कारण लक्ष्मणव्यतिरिक्त त्याच्या कुटुंबातलं कोणीच आमच्या ओळखीचं नव्हतं. त्यांच्या आईबाबांनी आम्हाला भेट द्यायला ज्वारी घेऊन त्याला पाठवलं होतं. आपण गेटच्या आत आलेलं आम्हाला आवडलं नाही तर, अशी भीती वाटल्यानं तो गेटच्या बाहेरच उभं राहून बोलत होता. ‘आम्ही रस्त्यावरची माणसं, यांच्या घरात कसं जाणार एकदम’ असा काहीसा भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याची समजूत घातल्यानंतर मग तो आत आला आणि थोडा वेळ बसून मग निघून गेला. लक्ष्मणचंही तसंच होतं. कधी आला तरी पटकन घरात यायचा नाही. मितभाषी आणि जेव्हा बोलेल तेव्हा दणकट शरीराला शोभणार नाही, असा मृदू आणि नम्र आवाज...
लोणेऱयात अॅडमिशन मिळाल्यानंतर तिथंही त्यानं अर्थातच थक्क करून टाकणारं लख्ख यश मिळवलं. हा प्रवास अर्थातच आत्ता मी लिहिला तेवढ्या चार-दोन ओळींत संपवण्याइतका सुलभ नव्हता. अनेक अडचणी, कष्ट यामधून त्याने हा प्रगतीचा रस्ता बांधला होता. त्याच्या शिक्षणासाठी त्याचा जुळा भाऊ राम याने रस्त्याच्या कामांची काँट्रॅक्ट घेऊन आर्थिक मदत केली. दरम्यानच्या काळात त्याच्याइतकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त हुशार असलेला धाकटा भाऊ संतोष यानेही आधी दहावीत आणि मग बारावीत उत्तुंग यश मिळवून सिव्हिल इंजिनीअरिंगला अॅडमिशन मिळवली आणि यशस्वीपणे त्याने ते शिक्षण पूर्णही केलं. त्या शिक्षणासाठी बँकेचं कर्ज मिळवून द्यायला पुन्हा बाबांनी धडपड केली. उपकार अशा भावनेने जरी बाबांनी ही मदत केलेली नसली, तरी लक्ष्मण आणि संतोषच्या दृष्टीने आम्ही त्यांच्यावर आणखी एकदा उपकार केल्यासारखंच झालं होतं. त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्याबद्दलची कृतज्ञता जाणवे.
लक्ष्मण आणि संतोष या दोघांचंही गणित उत्तम. अंकगणित असो, बीजगणित असो किंवा त्रिकोणमिती... या दोघांनाही त्यातलं काहीच कठीण वाटायचं नाही...कठीण प्रश्न समोर आला रे आला, की चॅलेंज म्हणून स्वीकारून तो सोडवायचा, हे त्यांचं वैशिष्ट्यच. अर्थात, आयुष्याच्या कठीण गणिताचं आव्हान त्यांनी स्वीकारलं होतं, त्यापुढं हे आकडेमोडीचं कठीण गणित यःकश्चितच ठरावं. ते आमच्याकडे अधूनमधून यायला लागल्यावर पिंकी आणि विशेषतः मी त्यांच्याकडून गणिताच्या टिप्स घेऊ लागलो. कारण मला तरी गणिताची प्रचंड भीती वाटायची. गणित समजायचं नाही असं नाही, पण काहीतरी घोळ होऊन शेवटी गणितामुळे मार्कांचा आलेख गटांगळ्या खायचा. पण या दोघांशी मैत्री झाल्यावर हळूहळू गणिताशीही मैत्री करावीशी वाटू लागली. लक्ष्मण दादा नंतर शिक्षणासाठी लोणेऱ्याला गेल्यामुळे संतोषदादाशी गट्टी जमली. लक्ष्मण दादाची शिकवायची पद्धत जरा गंभीर होती, पण संतोषदादा खेळीमेळीच्या वातावरणात शिकवे. मी दहावीला असताना बाकी सगळ्या विषयांचा माझा अभ्यास तयार होता, पण गणिताच्या बाबतीत माझा आत्मविश्वास कमी पडत होता. त्यावेळी माझ्या बोर्डाच्या परीक्षेच्या आधी संतोष दादा त्याच्या इंजिनीअरिंग कॉलेजला सुट्टी काढून आमच्याकडे आला होता. त्यावेळी माझ्याकडून त्याने गणिताची इतकी प्रॅक्टिस करून घेतली, की मला चक्क गणितात ८० टक्के मिळाले. बाकीच्या विषयात मला तेवढे मार्क मिळतील, याची खात्री होती. पण गणितातल्या या मार्कांचं श्रेय संतोषदादा आणि लक्ष्मणदादालाच जातं. पिंकीलाही गणितासाठी त्यांनी असंच मार्गदर्शन केलं.
कम्प्युटर इंजिनीअर झाल्यानंतर लक्ष्मण दादानं त्याच्या निवे या गावात छोटीशी कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केली. पण त्यात त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही. त्याची धडपड चालूच होती. कोल्हापुरात एका कॉलेजमध्ये त्याला लेक्चररशिप मिळाली. नंतर देवरूखजवळच्या आंबव इथल्या इंजिनीअरिंग कॉलेजात तो लेक्चरर झाला. अडीअडचणींची साथ होतीच. मध्यंतरीच्या काळात त्याचं लग्न झालं आणि एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्याने फर्स्ट क्लास मिळवून एम. टेक. पूर्ण केलं. आज आंबवच्या कॉलेजात तो एचओडी आहे. (याच कॉलेजच्या प्रमुखांनी लक्ष्मण दादाला जातीचं प्रमाणपत्र मिळत नव्हतं, तेव्हा शक्य असूनही मदत केली नव्हती, हे त्याला आता आठवत असेल की नाही, माहीत नाही.) अर्थात त्याला स्वतःला मोठ्या पदापेक्षा शिकवण्यात, शिकण्यात आणि संशोधनात जास्त रस आहे, असं तो सांगतो. कारण पदाबरोबर येणाऱ्या अन्य कारकुनी कामांमुळे वेळ जास्त जातो. अर्थात, त्याची गुणवत्ताच त्याला आज इथं घेऊन आली आहे. त्यानं स्वतःची जागा तर घेतली आहेच आणि आता त्यानं फोर-व्हीलरही बुक केलीय. मिळालेल्या संधीचं सोनं करणं, या उपमेसाठी एवढं नेमकं उदाहरण मी तरी अजून पाहिलेलं नाही.
लक्ष्मण दादाशी असलेल्या आमच्या नात्याची वीण रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट आहे, असं वाक्य मी सुरुवातीला लिहिलंय. त्याचा अर्थ असा नव्हे, की आमचे अगदी दररोज फोन होतात किंवा कायम एकमेकांकडे जाणं असतं. पण बाबांनी केलेल्या मदतीची त्यांनी जाणीव ठेवलीय. अनेकदा रक्ताच्या नात्याच्या माणसांकडूनही अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन झाल्यानंतर मग शेअर केले जातात. आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी दडवल्या जातात. पण लक्ष्मण दादाचं आणि आमचं नातं मात्र तसं नाही. फोरव्हीलर घेणार असल्याचं त्याने आधी बाबांना सांगितलं. ती बुक करायला रत्नागिरीत गेल्यानंतरही त्यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. अशा तऱहेने आजही कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना त्याचा माझ्या आई-बाबांना आवर्जून फोन येतो. लक्ष्मण दादा असो किंवा संतोषदादा, आम्हा दोघा भावंडांशीही त्यांचं अधूनमधून बोलणं असतं. आमच्या सुखदुःखाच्या प्रसंगी ते आमच्याबरोबर फोनच्या रूपाने का होईना, पण सहभागी असतात आणि हा सहभाग तोंडदेखला नसतो. ते मनापासून सहभागी झाले आहेत, हे जाणवतं. लक्ष्मण दादाच्या लग्नाला आई-बाबा काही कारणानं जाऊ शकले नव्हते. म्हणून लग्न झाल्यानंतर पत्नीला घेऊन तो पहिल्यांदा आमच्या घरी आला...आई-बाबांचे आशीर्वाद घ्यायला. आईसाठी मानाची म्हणून एक उत्तम साडी त्यानं आणली होती. नवी टू व्हीलर घेतल्यानंतरही तो पहिल्यांदा आमच्याकडेच आला होता. आता लवकरच तो कार घेणार आहे.
कार हेच आयुष्याच्या प्रगतीचं लक्षण आहे, असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण ज्या परिस्थितीतून वर येऊन लक्ष्मण दादानं ही प्रगती केलीय ना, त्यामुळे त्याच्या कार घेण्याच्या घटनेला खूप महत्त्व आहे. त्यानं साकार केलेल्या प्रगतीच्या रस्त्यावरून जेव्हा त्याची ही नवी कार धावेल, तेव्हा त्यानं आयुष्यातला एक मैलाचा दगड पार केलेला असेल. कोणे एके काळी त्यानं आणि त्याच्या कुटुंबीयांनी तयार केलेल्या रस्त्यावरून आपली नवी कोरी कार घेऊन जाताना त्याच्या भावना नक्की कशा असतील? यालाच नशीब घडवणं असं म्हणत असावेत का?
लक्ष्मण दादांच आयुष्य खरच प्रेरणा घेण्यासारख आहे! आपण किती छोट्या अडचणींचा बाऊ करतो हे अशा वेळी लक्षात येत!
ReplyDelete